- Written by: karnalaTrust
- February 28, 2026
संयोजकाचे मनोगत
– तेजाली शहासने
राष्ट्रभक्ती हा एक शब्द नसून संस्कृती, विचार, परंपरा आणि इतिहास यांचे जतन व संवर्धन करण्याची ती प्रक्रिया आहे. बहुभाषिक भारतामध्ये विविध भाषांच्या सहजीवनातून, संवादातून ही राष्ट्रभक्तीची भावना अधिक बळकट होते. भाषा ही आपली ओळख असते, परंपरा असते आणि ज्ञानपरंपरेची वाहक असते. म्हणूनच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाण्याची प्रक्रिया, अर्थात अनुवाद म्हणजे फक्त शब्दांचं भाषांतर नाही तर या सांस्कृतिक एकात्मतेचा एक संस्कृतीकडून दुसऱ्या संस्कृतीकडे प्रवास असतो. भाषविज्ञानाच्या जगात भारत हे एक बहुभाषिक आश्चर्य आहे. एवढ्या निरनिराळ्या भाषा जन्माला आल्या, रुजल्या, फुलल्या हे खरंच महदाश्चर्य आहे. आसेतूहिमाचल काश्मिरी, गढवाली, पहाडी, हिंदी, उर्दू, राजस्थानी, मराठी, छत्तीसगढी, मैथिली, बंगाली, गुजराती, उडिया, बोडो, डोगरी, तेलुगु, तुळू, कानडी, संथाळी, कोरकू, हळबी अशा निरनिराळ्या जात-कुळीच्या ३१ भाषा आणि २७० बोलींमध्ये भारतीय लोक जगतात, विचार करतात आणि साहित्य निर्माण करतात. नुसतं यादी वाचतानाच दम लागतो आपल्याला तर यातली प्रत्येक भाषा शिकायची म्हणजे हजार जन्मही कमी पडतील. याच भारतभूमध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचं स्वप्न प्रत्येक देशभक्ताचं असलं तरी व्यावहारिक जगात आजचा दिवस खरा आणि म्हणूनच आज, आत्ताच्या युगात जगताना हे वेगवेगळ्या भाषांतील आचार-विचार-परंपरा जोडण्यासाठी अनुवाद राष्ट्रीय सेतू ठरतो. इथेच अनुवादाचं भारतीय उपखंडातील महत्त्व अधोरेखित होतं आणि त्याचं राष्ट्रभक्तीशी नातं ही!
एका प्रदेशातील साहित्य दुसऱ्या प्रदेशात पोहोचते तेव्हा फक्त कथा किंवा कविता प्रवास करत नाहीत, तर त्या सोबत लोकांचे अनुभव, संघर्ष, मूल्ये आणि इतिहासही प्रवास करतो. एका भाषेतील संत साहित्य दुसऱ्या भाषेत पोहोचते तेव्हा श्रद्धा सामायिक होते. स्वातंत्र्यलढ्यातील लेखन विविध भाषांमध्ये वाचले जाते तेव्हा संघर्ष सामूहिक होतो. आधुनिक कादंबऱ्या आणि आत्मकथा इतर प्रदेशात पोहोचतात तेव्हा सहानुभूती निर्माण होते. त्यामुळे वाचकाला ‘परका प्रदेश’ आपलासा वाटू लागतो, त्याचं दुख: आपलं होतं त्याचं सुख आपलं होतं आणि इथेच राष्ट्रजोडणीचा पाया रचला जातो. यातून ‘मी’ ते ‘आपण’ हा प्रवास घडतो — आणि राष्ट्र ही संकल्पना भावनिक सत्य बनते. त्यामुळे अनुवादक हा केवळ भाषांतरकार नसून सांस्कृतिक दूत असतो. यामुळेच राष्ट्रभक्तीचा विचार करताना अनुवादाचा विचार करणे औचित्याचे ठरते.
सन २०१८ पासून राष्ट्रभक्तीचे समांतर अर्थ उलगडून दाखवण्यासाठी पर्यावरण, आरोग्य, संतसाहित्य असे वैविध्यपूर्ण विषय घेऊन कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट ‘राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन’ आयोजित करते. आठवे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आयोजित करताना मराठी भाषा संवर्धन, विविध मार्गाने होणारे भाषिक राजकारण, शासनाची सशक्त होणारी भाषिक धोरणं, नवे शैक्षणिक धोरण, स्थानिक आणि मातृभाषांना मिळणारी राजमान्यता असे विविध मुद्दे नजरेसमोर होते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता अनुवाद प्रक्रियेत मोठे बदल घडवत आहे. यंत्रानुवाद, बृहद भाषा प्रारूपे यामुळे भाषांतर वेगवान झाले आहे. विविध भाषांसाठी आता भाषा प्रारूपे निर्माण होत आहेत. भारत शासनानेही भाषिणी प्रकल्पाच्या माध्यमातून यावर भरीव काम सुरू केले आहे. सर्वम या अस्सल भारतीय कंपनीने अनेक भारतीय भाषांसाठी उत्तम दर्जाची आणि चॅट जीपीटीलाही मागे टाकेल असे मापदंड वापरून अत्यंत सक्षम प्रारूपे निर्माण करून एक मोठी झेप घेतली आहे. यामुळे अनुवादक ही जमात संपुष्टात येईल की काय अशीही भीती अनेकांना वाटत आहे. ही भीती अगदी निराधार नाही, पान याची दुसरी बाजूही लक्षात घेणं आवश्यक आहे. एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी की तंत्रज्ञानाने क्रिया वेगवान होतील, परंतु अर्थाची संवेदनशीलता, तरलता आणि खोली मानवच देऊ शकतो. भविष्यातील अनुवादक हा ‘मानव + कृत्रिम बुद्धिमत्ता’ असा सहकार्यात्मक स्वरूपाचा असेल. तंत्रज्ञान माहिती पोहोचवेल आणि मानव त्याला सांस्कृतिक अर्थ देईल. अशा संतुलनातूनच खरी राष्ट्रीय जाणीव घडेल.
हे सर्व पाहता आज आपल्याला एका नव्या धाटणीच्या अनुवादकांची गरज आहे हे आमच्या लक्षात आलं. या नव्या युगाचा अनुवादक भाषांवर पक्की पकड असणारा हवाच पण तो अत्यंत तंत्रस्नेहीही हवा. बदलत्या हवेप्रमाणे शीड फिरवता येणारा हवा. पुढच्या काळात कदाचित त्याला अनुवादापेक्षाही कृत्रिम बुद्धिमत्तेने घडवलेल्या लेखनाला दिशा देण्याचं, हवे ते भावनांचे कंगोरे, आशयाची डूब देण्याचं काम करावं लागेल. यासाठी प्रचंड व्यापक दृष्टिकोन, वैचारिक प्रगल्भता आणि तंत्रज्ञान वापरण्याचं कसब असा त्रिवेणी संगम आवश्यक असेल. हे असं कौशल्य घडवण्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणून ‘अनुवादातून राष्ट्रभक्ती’ या विषयावरील संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मराठी भाषा जतन, संवर्धन आणि प्रसाराच्या उद्देशाने हा आमचा पहिलाच प्रकल्प आहे. या संमेलनातून नव्या पिढीला अनुवादाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळावी, अनुवादकांना नव्या वाटा गवसाव्यात आणि ज्येष्ठांना आपले काम पुढे नेणारे उत्तराधिकारी मिळावेत!
आता विश्वात्मके देवे | येणे वाग्यज्ञे तोषावे| तोषोनि मज द्यावे| पसायदान हे ||
